SSC-HSC Timetable: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित होणाऱ्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) व बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षांच्या वेळापत्रकासंदर्भात सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर या परीक्षांच्या वेळापत्रकांची चुकीची माहिती पसरल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून या अफवांवर बंदी आणली आहे.
मंडळाने स्पष्ट केले आहे की, फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित होणाऱ्या दहावी(Secondary School Certificate) व बारावीच्या(Higher Secondary Certificate) लेखी परीक्षांची सविस्तर वेळापत्रके अद्याप अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. तरीही काही संकेतस्थळांवर या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याचे खोटे दावे केले जात आहेत. मंडळाने या खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

परिपत्रकात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांनी व पालकांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.mahahsscboard.in)च फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक पाहावे. वेळापत्रके योग्य वेळी आणि सविस्तरपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील.

दहावी बारावी वेळापत्रक बाबत अशा चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे मंडळाने बजावले आहे. परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत(SSC-HSC Exam Schedule) खोटी माहिती देऊन गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य माहिती मिळाल्यामुळे त्यांचा गोंधळ दूर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक येईपर्यंत धीर धरावा आणि सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.