First look of Suraj Chavan's movie 'Raja Rani': सध्या महाराष्ट्रात सर्वत्र 'बिग बॉस मराठी' सीझन ५ ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. यंदाच्या 'बिग बॉस मराठी' च्या विजेत्याच्या ट्रॉफीवर गुलिगत किंग सूरज चव्हाणने आपले नाव कोरले आहे. 'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय रियालिटी शोचा पाचवा सीझन जिंकून सूरज चव्हाणने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. छोट्या पडद्यावर मोठं यश मिळवल्यानंतर, आता सूरज मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Raja Rani Marathi Movie

सूरज चव्हाणचा पहिला मराठी चित्रपट 'राजा राणी' लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा सूरजच्या मूळ गाव मोडवे, रामती तालुक्यात पार पडला. हा सोहळा सूरजने आपल्या आई मरिमातेच्या चरणी नतमस्तक होत आयोजित केला होता. या ट्रेलर लाँच सोहळ्यात 'बिग बॉस मराठी' मधील आणखी एक प्रसिद्ध चेहरा वैभव चव्हाणने देखील हजेरी लावली होती. या सोहळ्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'राजा राणी' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये त्याचा अभिनय आणि त्याचे गुलिगत व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे आहे. त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट मोठी पर्वणी ठरणार आहे. चित्रपटात सूरज चव्हाणसह रोहन पाटील, वैष्णवी शिंदे, तानाजी गळगुंडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. संगीत पी. शंकरम यांचे असून पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर या गायकांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे, तर छायांकनाची जबाबदारी कृष्णा नायकर आणि एम. बी. अलीकट्टी यांनी सांभाळली आहे.

सूरज चव्हाणचा 'राजा राणी' हा बहुप्रतीक्षित चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.