Rinku Singh apologizes after playing a tremendous game: सेंट पीटर्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० मध्ये जॉर्ज पार्क येथे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात रिंकू सिंगने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वाना प्रभावित केले आणि आपले पहिले T20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. अवघ्या 39 चेंडूत 68 धावांची अप्रतिम खेळी खेळत रिंकूने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय कर्णधार सूर्यकुमार यादवला दिले. 

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रिंकू सिंग दुसऱ्या T20 दरम्यान काच फोडल्याबद्दल माफी मागताना आणि कर्णधार सूर्या यांच्या समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे. मीडिया बॉक्सची काच फोडल्यानंतर सूर्याने त्याला घाबरू नको आणि नैसर्गिक खेळ खेळण्याचा सल्ला दिल्याचे रिंकूने नमूद केले.

याशिवाय काच फोडणाऱ्या सिक्सचा उल्लेख करत रिंकू म्हणाला, "असे घडले याची मला कल्पनाही नव्हती. त्याबद्दल मी माफी मागतो." दुसऱ्या T20 सामन्याच्या 19व्या षटकात एडन मार्करमच्या चेंडूवर रिंकूने षटकार मारला जो थेट मीडिया बॉक्सच्या काचेत गेला. त्याच्या या शॉटने काच फुटली आणि रिंकूच्या जोरदार फटक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.