जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

४ कोरोना बाधित बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज- अमरावती येथील कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या चौघांना पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज

अमरावती, दि. २४ : येथील कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या चार कोरोनाबाधित रूग्णांना ते पूर्णपणे बरे झाल्याने आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात दाखल या चारही रुग्णांचे रिपोर्ट उपचारानंतर निगेटिव्ह आले. ही बाब दिलासा देणारी ठरली असून, रुग्णालयाचे डॉक्टर, पारिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात या चौघांचे अभिनंदन केले.

४ कोरोना बाधित बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज


हाथीपुरा परिसरातील एका निधन झालेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चारजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रूग्णालय स्थापित करण्यात आले असून, तेथे तज्ज्ञ डॉक्टर, पारिचारिका व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. तिथे 14 दिवस या रूग्णांवर उपचार सुरू होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सर्व डॉक्टर, पारिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज दिला. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन ब-या झालेल्या रूग्णांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. अमरावती महापालिका हद्दीतील पहिल्या रूग्णाच्या संपर्कातील चारजण आज बरे होऊन परतत आहेत, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. निकम यांनी व्यक्त केली.

रुग्णालयात सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कुणाही नागरिकांनी कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली की तात्काळ रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना या बऱ्या झालेल्या रूग्णांनी यावेळी व्यक्त केली.

उपचारादरम्यान रुग्णांनी वॉर्डातील सर्व स्टाफशी चांगले सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या काळात नागरिकांनीही दक्षतेचे पालन करावे. कुठलीही लक्षणे दिसताच तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कोविड रूग्णालयात सेवा देणाऱ्या पारिचारिकांनी केले.
सोर्स : महासंवाद
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या